22 يناير, 2012

हरुनही जिंकली -एक मानिनी


हरुनही   जिंकली -एक मानिनी 
आज रविवार आहे .हे स्वातीच्या लक्षातच आले नाही .तिने घड्याळाकडे  नजर टाकली तर त्यात नऊ वाजत आले होते .तिला खूप अस्वस्थ वाटत होते .अचानक सोनूची आठवण आली .
मग तिच्या लक्षात आले कि काल शनिवार आणि आज रविवार असल्यामुळे  ती  सोनुला आई कडे सोडून आली होती .स्वातीने भरभर  कामे आवरली ,चहा घेऊन टी.व्ही समोर बसली .१०.३० वाजता तिचा आवडता कार्यक्रम येणार होता .सुनील अजून उठला नव्हता .तो रविवारची झोप चांगली ताणून घेतो .तेवढ्यात वीज  गेली.आत्ता कसली टी .व्ही बघणार .चहा पीत पीत स्वाती विचार करत होती ,
येत्या २८ तारखेला आपल्या लग्नाचा १० वा वाढदिवस आहे .तिला स्पष्ट आठवत होते .ती लग्न होऊन या घर आलेली ,नंतर सोनूचा जन्म झाला .वर्षामागून  वर्षे गेली .तशी  स्वातीला कशाची कमतरता नव्हती .प्रेमळ नवरा ,एकुलता एक मुलगा .नजर लागावी असे सुखी समाधानी कुटुंब होते .पण जेंव्हा स्वाती एकटी असायची ,तिला भूतकाळ आठवायचा .काम करताना कधीही दिवसातून एकदातरी तिला साहिल  ची आठवण येत असे .
तिला वाटायचे आपण जे केले ते बरोबर नाही केले भविष्यात एकदा तरी साहीलला भेटून माफी मागायची  होती. 
स्वातीला तिने पहिल्यांदा साहिलला  बघितले तो दिवस आठवला .आणि एक एक करून सगळ्या स्मृती उगाचच डोळ्यासमोरून तरळून गेल्या .
   कॉलेज मध्ये असताना एकदा क्लाससमोर साहीलला उभे असलेल पाहिलं आणि पुनपुन्हा पहावं वाटलं .त्याच दिवशी ती तिचे मन हरवून बसली होती. त्याचे नाव ,कुठल्या क्लास मध्ये शिकतोय काहीच माहित नव्हते . हळूहळू सर्व माहिती तिला मिळाली .कोणीतरी एकदा त्याच्याशी तिची  ओळख ही करून दिली .पण तिने कधी आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत .तिने जेंव्हा तिची खास मैत्रीण प्रियाला सांगितले .खुश होऊन प्रिया तिला म्हणाली कि ,स्वाती तू प्रेमात पडलीय .कोण आहे तो ? स्वातीने प्रियाची साहिलशी ओळख करून दिली .प्रियाला काही तो आवडला नाही .
प्रियाने स्वातीला बजावले कि ,अगं तो मुस्लीम आहे .तुला काही कळतं का ?तू त्याच्याशी यापुढे बोलू नकोस .प्रियाच्या बोलण्याचा परिणाम कि काय खरचं स्वातीने साहिलकडे दुर्लक्ष्य करून अभ्यासात मन गुंतवले .पण त्याचा चेहरा काही तिच्या मनातून जात नव्हता .
मग तिने प्रियाला आपली अस्वस्थता सांगितली .
त्यात स्वातीची काय चूक तिने जात धर्म बघून थोडीच प्रेम केले त्याचेवर .स्वाती बोलली कि मी माझ्या नशिबाला एक चान्स देणार आहे .
स्वातीने सांगितले कि ,मी एक पत्र लिहिते त्यात फक्त लिहीन कि मला शोध .जर माझ्या नशिबात त्याचे प्रेम असेल तर तो मला शोधेल.
नाही शोधले तर मी त्या क्षणापासून त्याचा विचार सोडून देईन .प्रियानेही हो म्हंटले .आणि पत्र टाकले .साहीलला मिळाले .त्याची अवस्था विचित्र  झाली होती.आता प्रत्येक मुलीकडे काळजीपूर्वक पाहत होता .पण त्याच्या काही शेवटपर्यंत लक्षात नाही आले .पुढे स्वातीने आपल्या मनाची कशीबशी समजूत घातली .पुढे परीक्षा  होऊन सुट्या लागल्या .स्वाती सुट्ट्यात मामाच्या गावाला गेली .पण संपूर्ण सुट्टी भर तिला करमले नाही.कसे करमणार मनच  हरवले होते .खूप विचार करून तिने ठरवले कि आपण साहीलला भेटून सर्व सांगूया  .पण त्यापूर्वी सुट्ट्या  मध्ये  एक आक्रीतच घडले .स्वातीच्या नातेवाईकापैकी एक  मुलीने  एका  मुलासोबत प्रेम विवाह केला होता . हि बाब सर्व नातेवाईकांना खटकली .समाजाचा खूप रोष ओढवून घेतला होता .स्वाती या घटनेने जबरदस्त हादरली  .स्वातीचे आईवडील भाऊ बहिण सगळेच जण
विरोधात बोलत होते .त्या मुलीच्या आई वडिलाची अवस्था खूपच बिकट झाली होती .याचा परिणाम स्वाती वरही  झाला होता .तिलाही कुठेतरी अपराधीपणाची भावना वाटत होती. स्वातीचे काही नातेवाईक स्वातीला सुद्धा कॉलेज मधून कडून घ्या असे म्हणत होते .पण स्वातीचे आईबाबा बोलले कि आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे,आम्ही कोणाचाही सांगण्यावरून  तिचे शिक्षण थांबवू शकत नाही .आत्ता मात्र स्वातीची पंचाईत झाली होती . मग तिने  मनाशी एक निश्चय केला .आपण आपल्या भावनांचा त्याग करायचा .आई -वडील, भाऊ- बहिण सर्व नातलग यांचा राग ओढवून आपण सुखी राहणार नाही .परत कॉलेज चालू झालेवर साहिलच्या लक्षात आले होते कि ,स्वातीनेच लेटर पाठवले होते .त्याला पक्की खात्री नव्हती पण तो तिला विचारणार होता .हे तिला प्रिया कडून कळले होते .स्वातीला वाटले जर साहिलने एक पाऊल आपल्या दिशेने टाकले तर आपल्याला माघार घेणे जड जाईल .त्यापेक्षा असे काय करावे कि ,साहिल स्वातीविषयी राग येईल आणि स्वाती एक चांगली मुलगी नाही असे समजून तिच्याशी बोलणे टाळेन.खूप विचार करूनही डोक्याचा भुगा झाला होता .मग प्रियाला एक युक्ती सुचली .
साधी सरळ स्वाती एकदम बदलली होती .मुलांशी दोस्ती करू लागली .हळू हळू तिच्या वागण्यातला मोकळेपणा साहिल ला खटकू लागला होता .
त्याने तिच्याशी बोलणे सोडले होते .एकदा कॉलेजची ट्रीप गेली होती .स्वाती त्यावेळी बहिणीकडे गेली होती ,त्यामुळे ती जाऊ शकली नाही .
पण नंतर सर्वांनी स्वातीला विचारले कि ,तू का नाही आलीस ? स्वाती काही बोलण्याआधी ,साहिलनेच टोमणा मारला कि ,असे ट्रीपला पाठवायला घरच्यांचा विश्वास नसेल तिच्यावर ?
त्यावेळी स्वाती गप्प होती कारण तिला दाखवायचे होते ,तेच साहिल बघत होता किंवा बोलत होता .तिने सुटकेचा निश्वास सोडला खरा पण आतून 
पुरती मोडून पडली होती .कित्येक रात्री तिने जागून काढल्या होत्या .पुढे कालंतराने स्वाती शिक्षण पूर्ण करून नौकरी करत होती .
त्याचवेळी सुनीलचे स्थळ सांगून आले होते .सुनील तिच्या नात्यातला होता ,त्याने स्वतः  हून स्वातीला मागणी घातली होती .लग्न होऊन एवढी वर्ष झाली होती ,तरी तिला तिचा आत्मा स्वस्थ बसू देत नव्हता .कधीतरी साहीलला भेटून त्याची माफी माघायला  हवी असे तिला वाटत होते .तो कुठे असेल कधी भेटेल  का ? आणि आपण खरे सांगितल्यावर तो काय विचार करेल .त्याला  हे सगळे खरे वाटेल काय ?कि तो आपल्याबद्दल चुकीचा विचार करेल .हि लग्न नंतरही बदलली नाही .चांगले कि  वाईट विचार करेन .स्वाती एकदम विचार मग्न झाली होती .एक ना हजारो प्रश्न तिला पडत होते कि आपण काहीच बोलू नये .झाकली मुठ सवा लाखाची .पण मन मानत नव्हते .त्याची माफी मागून आपण स्वतःला च माफ करणार आहोत . 
तेवड्यात दरवाज्यावरच्या बेलने स्वाती भानावर आली .  
 मनिषा -बांगर -बेळगे